

जळगाव : गुजराल पेट्रोल पंप परिसरातील गौरवास्पद अमृत प्री-स्कूल येथे दिनांक १० जानेवारी २०२६, शनिवार रोजी स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी सादर केलेल्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले “सत्ययुग ते कलियुग – एक मानवी देहाचा प्रवास” या विषयावर सादर केलेले आगळे-वेगळे नाटक. या नाटकातून लहानग्यांनी प्रभावी अभिनय सादर करून प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली गालापुरे मॅडम व गुरुजन श्री. व्ही. टी. गालापूरे सर (निवृत्त प्राचार्य) उपस्थित होते. तसेच पी. आर. हायस्कूल, धरणगावचे डायरेक्टर श्री. रामदास अलई सर (चांदवड) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा अमृतकर मॅडम व चेअरमन धनंजय अमृतकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्नेहसंमेलनानिमित्त बालगोपालांनी गीतगायन, एकल नृत्य, समूह नृत्य, टॉलीवूड नृत्य, लावणी नृत्य तसेच नाट्यप्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, मेडल, ट्रॉफी व विविध बक्षिसांचे वितरण करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षिका हेमांगी देशमुख व पूजा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका निकिता जाधव यांनी केले. यावेळी शाळेतील कोमल कुलकर्णी, पूजा पाटील, निकिता जाधव, हेमांगी देशमुख, रुपाली पाटील व माधुरी देवरे या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच राजश्री ताई व मोनाली ताई यांचाही सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे अमृत प्री-स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव अधिकच उजळून निघाला असून पालकवर्गातूनही कार्यक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.




