

जळगाव – जुने जळगाव येथील आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उर्फ सतीश मिलिंद गायकवाड यांची आझाद समाज पार्टी (काशीराम) च्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. पद्मालय विश्रामगृह येथे 3 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सदरची नियुक्ती करण्यात आली. आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित साळवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सदर नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रकाश सोनवणे, सचिन सोनवणे, लखन बनसोडे, सचिन सैंदाणे, आबा मोरे, योगेश तायडे, प्राजक्ता तायडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व जळगाव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून पक्ष संघटना भक्कम करून सर्वसामान्यांपर्यंत पक्षाचे कार्य पोहोचविणार असल्याचे यावेळी सतीश गायकवाड यांनी सांगितले.
श्रीकांत गायकवाड परिवर्तन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असुन मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे जळगाव शहर अध्यक्ष आहेत. तसेच जळगाव महानगर डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळालेला आहे. परिवर्तन ग्रुपच्यामाध्यमातून ते नेहमीच समाजहिताचे कार्य करीत असतात आणि बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उचलून मोर्चे, आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत असतात. त्यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची उचित दखल घेत आझाद समाज पार्टीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष या पदावर सतीश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप अहिरे, समाधान सोनवणे, भारत सोनवणे, सुरेश फालक, किरण सोनवणे यांच्यासह समाजातील विविध घटकांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे.




