

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांत आनंदाचं झाड हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. शिक्षण ही एक आनंददायी घटना आहे. त्या घटनेतून लेकरांना नवं काहीतरी शिकता यावं, नवनिर्माण करता यावं, आनंद मिळावा. यासाठी आनंदाच्या झाडात आम्ही नावीन्यपूर्ण उपक्रम घेणार आहोत. यातून उद्याची आनंदाची झाडं निर्माण होणार आहेत. या झाडांचा आनंद सर्वांना मिळावा यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे; असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले .शाळेच्या मैदानावर झाडाच्या दाट सावलीमध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्याने उपक्रमांची सुरुवात अतिशय आनंदात झाली . पहिल्याच दिवशी उपशिक्षक दिनेश पाटील सर यांनी इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीच्या मुलांना वर्ग काढण्याच्या सोप्या पद्धती शिकवल्या. आनंदाचे झाड या उपक्रमात शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त शाळेतील प्रत्येक शिक्षक रोज एक तास नवीन कला कौशल्य शिकवणार आहे.




