

मुंबई/जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवत सर्वच्या सर्व ४६ जागांवर दणदणीत यश संपादन केले आहे. या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार भोळे यांचा विशेष सत्कार करत त्यांच्या नेतृत्वाचे आणि निवडणूक नियोजनाचे मनापासून कौतुक केले.
जळगाव महापालिकेच्या ४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक व शिस्तबद्ध प्रचार केला. आमदार राजूमामा भोळे यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणा स्वतःच्या मार्गदर्शनाखाली राबवत ‘विकास’ आणि ‘पारदर्शक प्रशासन’ हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून मतदारांशी थेट संवाद साधला. या रणनीतीला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला असून निकालात भाजपने सर्व ४६ जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे विरोधी पक्षांना एकाही जागेवर खाते उघडता आले नाही.
या विजयाची माहिती देण्यासाठी व पुढील विकासात्मक नियोजनावर चर्चा करण्यासाठी आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि जळगावमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाला ‘लोकविश्वासाचा कौल’ असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जळगावकरांनी भाजपवर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.”
यावेळी आमदार राजूमामा भोळे म्हणाले, “हा विजय माझा वैयक्तिक नसून जळगावमधील प्रत्येक कार्यकर्ता आणि नागरिकांचा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. आता आमचे लक्ष केवळ जळगावच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासावर केंद्रित असेल.”
या ऐतिहासिक विजयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात भाजपच्या नेतृत्वाची आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यशैलीची जोरदार चर्चा सुरू आहे.




