

जळगाव – गुरुपौर्णिमा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येतात. नेहमी नवोपक्रम राबविणारे संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेनुसार गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंधेला ‘एक झाड गुरु साठी’ वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन केल्याने मानवी जीवनास अनुकूल असे वातावरण निर्माण होते.
यंदाच्या उन्हाळ्यात ४० डिग्री पेक्षा जास्त तापमान सर्वाना अनुभवायला मिळाला आहे, याची पुनरावृत्ती होण्यापेक्षा आपण वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यावर भर देण्याची गरज आहे. अमर्याद वृक्षतोड यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असल्याने अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांची नासाडी, भूकंप, महापूर, अनियमित ऋतुमान, वाढते प्रदूषण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण पाऊस आणि निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो, पण मानव म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हि आपली जबाबदारी आहे. म्हणून आजच्या युगातील एकलव्याने अंगुठा न कापता आपल्या गुरुसाठी झाड लावणे अपेक्षित आहे. म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना एक झाड गुरुसाठी उपक्रमाचे आवाहन केलेले आहे. पर्यावरण पूरक उपक्रम एक झाड गुरुसाठीची सुरुवात शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी दहा फूट उंचीचे बेलाचे झाड लावून केली. सदर वृक्षारोपण करताना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.




