

करमाळा : पंढरपूर वारीसाठी प्रवास करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या तक्रारीनंतर, करमाळा एस.टी. आगारातील एका स्टॉलवर वाढीव दराने नाथ जल विक्री करणाऱ्या विक्रेत्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभाग नियंत्रकांनी ₹१००० दंड ठोठावला आहे.
भगवान चौधरी हे जळगाव–पंढरपूर महामंडळाच्या एस.टी. बसने प्रवास करीत असताना करमाळा आगारात बस थांबली. त्या वेळी काही भाविक “नाथ जल” पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी आगारातील ‘सद्गुरू’ स्टॉलवर गेले. मात्र, याठिकाणी ₹१५ किंमतीची ‘नाथ जल’ या पाण्याची बाटली विक्रेत्याने कोणतेही बिल न देता थेट ₹२० ला दिली. चौधरी यांनी यावर आक्षेप घेत बिल मागितले, पण त्यास नकार दिला गेला.
शासनाने ३ मार्च २००८ रोजी जारी केलेल्या स्थायी आदेशानुसार (सामान्य स्थायी आदेश क्र. ११९९), प्रत्येक एस.टी. आगारात नाथ जल पाण्याची बाटली ₹१५ दरात विक्री करणे बंधनकारक आहे.
या प्रकाराची चौधरी यांनी “आपले सरकार” पोर्टलवर तक्रार करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत, सोलापूर विभाग नियंत्रकांनी सदर परवाना धारक विक्रेत्याला ₹१००० दंड ठोठावला. तसेच, भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित स्टॉलचा परवाना रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.



