

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा नुकताच गौरव करण्यात आला. निवड झालेल्या जिल्हास्तरावरील उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव या कार्यालयाचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यालय प्रमुख श्री. देवेंद्र अग्रवाल यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
ही गौरवशाली कामगिरी उत्कृष्ट सेवा, पारदर्शक कार्यपद्धती आणि जनहितासाठी सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या सन्मानाने जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयांना प्रेरणा मिळून कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अशीच कार्यक्षमता आणि जनहिताची भावना पुढेही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




