कुंभमेळा सविस्तर वृत्तांत व एका भाविकाचा अनुभव


गुरू हा ग्रह कुठल्या राशीत, नक्षत्रात प्रवेश करतो या त्याच्या भ्रमणावर कुंभमेळा आधारित आहे. गुरु जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा हरी की पावडी हरिद्वार येथे कुंभमेळा होतो. जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो त्यावेळेला नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. ज्या वेळेला मेष राशीमध्ये गुरुप्रवेश करतो त्या वेळेला प्रयाग येथे कुंभमेळा भरतो. गुरुचा सूर्याभोवतीचा भ्रमणकाकाल बारा वर्षाचा आहे. साधारण बारा वर्षानंतर गुरू त्या राशीमध्ये पुन्हा प्रवेश करतो त्यामुळे त्या वेळेस कुंभमेळा भरत असतो. पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातुन निघालेल्या अमृत कलशाच्या वाटणीवरून देव आणि दैत्यांचे बारा दिवस युद्ध झाले आणि या युद्धाच्या दरम्यान चार स्थानी कुंभातील अमृताचे थेंब हे पडले, म्हणूनच या चार स्थानी कुंभ मेळा भरत असतो. यावर्षी मेष राशीत गुरूने प्रवेश केल्यामुळे प्रयाग येथे मकर संक्रांती पासून महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळा भरला आहे .
कुंभमेळ्यात देशभरातील साधू संत हि पर्वणी साधण्यासाठी प्रयाग येथे एकत्र येतात. संपूर्ण कुंभाच्या कालखंडामध्ये ते तिथे ध्यानधारणा तपश्चर्य करतात. पूर्ण काळ तिथे राहण्यास कल्पवास असे म्हणतात. नागा साधूंचा हजारो वर्ष एक संघटनात्मक ढाचा आहे. या ढाच्यालाच आखाडा असे म्हणतात. आपल्याकडे प्रामुख्याने 13 आखाडे आहेत. हे नागा साधू आखाड्यांशी संलग्न असतात व आखाड्यांच्या शिस्तीमध्ये ते राहतात. ज्याला दीक्षा घ्यायची आहे त्याला जिवंतपणे स्वतःच स्वतःचे श्राद्ध करावे लागते. त्यांचे जीवनही अतिशय कष्टमय असते. या कुंभमेळ्यामध्ये जवळपास दहा हजार पेक्षा जास्त लोकांनी दीक्षा घेतली आणि जवळपास चार लाख नागा साधू जुना आखाड्याशी संलग्न आहेत असेही समजते. अनेक साधुसंत शिक्षित असतात त्यांचं धर्माबद्दलच तत्वज्ञानही अफाट असते. परंतु आपण मात्र त्यांची चेष्टाच करतो. मेळा म्हटला कि हौशे नवशे सर्वच तिथे येत असतात, चॅनेलवाले पण अशाच लोकांना प्रसिद्धी देतात व आपली आपल्या संत समाजाबद्दल चुकीची धारणा निर्माण होते. खऱ्या तपस्वींचं दर्शन घ्यायचं असेल तर अशा आखाड्यांमध्येच जावे लागते. नागा तपस्वी साधू संन्यास घेत असतांना सर्व संसारिक अधिकारांचा त्याग करतात. फक्त कुंभातील पहिल्या स्नानाचा अधिकार स्वतः जवळ ठेवण्यात आलेला आहे. पण काल प्रयागराज महाकुंभातील गर्दी पाहून, हा अधिकार देखील त्यांनी सोडून दिला आणि जगभरातील इतर भाविकांनी स्नान केल्यानंतर स्नान करण्याचा निर्णय घेतला. हिच आहे सनातन धर्माची संस्कृती.
या वेळेला मी मौनी अमावस्येच्या पर्वा निमित्त कुंभामध्ये आलो होतो आणि अग्नी आखाड्यामध्ये राहण्याचे भाग्य मला लाभले. आम्ही अमृत स्नानासाठी या आखाड्याबरोबरच जायचे ठरले होते. परंतु रात्रीची दुर्दैवी घटना झाली आणि सरकारने ह्या आखाड्यांचे अमृत स्नान रद्द केले. खरे म्हणजे अमृत स्नान हा या आखाड्यांचा साधू संतांचा असे म्हटले तर मानाचा अधिकार असतो. परंतु कुठेही गोंधळ न होता सर्व साधू संतांनी हा निर्णय लगेच मान्य केला. त्यावरून त्यांची समाजाबद्दलची आपुलकी, श्रद्धा आणि आखाड्यातील शिस्त लक्षात येते.
भागवत कथा, राम कथा, प्रवचन अशा धार्मिक उपक्रमा बरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनी तिथे फ्री मेडिकल चेकअप फ्री डोळे तपासणी लोकांना चष्मा काढून देणे असे विविध उपक्रम राबवतात. बौद्ध महा कुंभ, खेळ महा कुंभ, जनजाती महा कुंभ अशा प्रकारचे पण विविध उपक्रम गेल्या महिन्याभरात त्या ठिकाणी राबवले गेले. धार्मिक, सामाजिक, सेवा उपक्रमही आपल्याला तिथे अनुभवायला मिळतात.
कुंभ 22 सेक्टर मध्ये विभागला गेला आहे काही सेक्टर आखाडे, शंकराचार्य मठ, संस्था, संघटना यांच्यासाठी राखीव आहेत. तर काही सेक्टर मध्ये हे सशुल्क लोकांना राहण्याची सोय केली आहे. सर्व आखाड्यात त्यांचे भाविक आणि सामान्य लोकांसाठी आखाड्यांनी राहण्याची निशुल्क व्यवस्था केलेली आहे. अनेक लंगर लाखो लोकांना निशुल्क भोजन तिथे उपलब्ध करून देत असतात. मौनी अमावस्येला एवढे करोडो लोक एकत्र आले होते. परंतु कुठेही अस्वच्छता नव्हती मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक संडासची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. कुठेही घाण किंवा वास येत नव्हता रस्त्यावरून जाण्यासाठी वाळू मधून चालता यावे म्हणून पत्र्याच्या शीट टाकल्या आहेत. वाळू मोठ्या प्रमाणावर उडते म्हणून त्यावर पाणी मारले जात होते. गर्दीचे व्यवस्थापन आहे उत्तम प्रकारे केले जात होते पोलिसांचे वागणे कुठेही अरेरावीचे, दमदाटीचे नव्हते कामाचा लोड असूनही पोलिसांना शांतपणे काम करताना बघून मला आश्चर्यच वाटले. एवढी गर्दी असूनही धक्का लागला म्हणून कोणी कोणाशी भांडत नव्हते ट्रॅफिक असतांनाही इतर वेळेस दिसणारी ट्रॅफिक तोडण्याची मानसिकता कुठे दिसत नव्हती. सर्वगाड्या शांतपणे रांगेत उभे राहत होते. एवढी गर्दी असूनही कुठे भाव वाढ करण्याची वृत्ती दिसत नव्हती. पाण्याची बाटली वीस रुपयाला, पुरी भाजी वीस रुपये, चहा पाच रुपये इतके स्वस्त आहे. फेरीवाले दुकानदार याचबरोबर गंध लावणारे टू व्हीलर वाले रिक्षावाले अशा सर्व सामान्य लाखो लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.
कुंभामध्ये असे हिमाचल पसरलेल्या भारताचे दर्शन घडते. प्रत्येक राज्यातील भाविक कुंभात येतात कुठली उच्चनीचता, भाषा भेद, जातीभेद आपल्याला कुंभात आढळत नाही. सर्वांमध्ये एक सात्विकता असते, आत्मीयता असते एकमेकांना मदत करण्याची भावना असते. सर्वांना 15-20 किलोमीटर हे पायी चालत जावे लागते, अनेक जण रात्री प्रचंड थंडीमध्ये गार पाण्यात डुबकी मारतात. धक्काबुक्की असूनही कोणाला त्रास होत नाही चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान आपल्याला बघायला मिळते. जो तिथे नुसता पर्यटक म्हणून गेलाय त्याला गर्दीचा, ट्रॅफिक जामचा, थंडीचा त्रास होतो.जो भाविक आहे त्याला मात्र गंगेमध्ये अमृतस्नान करून आत्मिक समाधान मिळते. महाशिवरात्रीचे शेवटचे अमृत स्नान असल्याने धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, सेवा कुंभात हजेरी लाऊन त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्याचे पुण्य करावे.

