

जळगाव दि. २४ नोव्हेंबर २०२५ — गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील PPP प्रकल्पावरील आरोपांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजली दमानिया यांना खुले पत्र जारी करून थेट स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या खुल्या पत्रात दमानिया यांनी केलेले आरोप “पुराव्याविना, प्रशासकीय प्रक्रियेची पूर्ण माहिती न घेता आणि विशिष्ट व्यक्तींवर थेट लक्ष केंद्रित करत” करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या दाव्यांना “कायद्याच्या दृष्टीने धोकादायक आणि मानहानीसदृश” असे संबोधले आहे.
निविदा प्रक्रियेवरील तथ्ये सार्वजनिकपणे स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की १५ मे २०२५ रोजीची EOI (क्रमांक 2025_MCGM_1179509) ही पूर्णपणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रातील प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अजित पवार यांनी कोणताही हस्तक्षेप केल्याचा पुरावा अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच निविदेत अंतिम पात्रता मिळवलेल्या “टर्ना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, सुरभी एज्युकेशनल सोसायटी” या दोन संस्थांची नावेही त्यांनी जाहीर केली
“निविदा अद्याप मंजूरही झालेली नसताना ‘५०० कोटींचा घोटाळा’ म्हणणे हे दिशाभूल करणारे आहे,” असे शिंदे यांनी म्हटले आहे.
शिंदे यांनी दमानिया यांना पुढील मुद्द्यांवर औपचारिक स्पष्टीकरण देण्याची आणि पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे :
1. अजित पवार यांच्या हस्तक्षेपाचा कोणताही लेखी/दस्तऐवजी पुरावा
2. BMC अधिकारी किंवा समितीविरुद्ध तक्रार न देण्याचे कारण
3. टर्ना ट्रस्टविषयी आक्षेपाचे वस्तुनिष्ठ पुरावे
4. निविदा मंजूर न होता देखील ‘घोटाळा झाला’ असे म्हणण्यामागील आधार
5. आरोप राजकीय प्रेरित आहेत का?
त्यांनी स्पष्ट केले की विधान करतांना डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, फायनान्शियल ट्रेल आणि प्रशासकीय नोटशीट्स आवश्यक असतात, आणि ते दमानिया यांनी अद्याप सादर केलेले नाहीत.
सार्वजनिक चर्चेचे खुले निमंत्रण
गोवंडी शताब्दी रुग्णालय PPP निविदा या वादावर तथ्यात्मक चर्चा व्हावी म्हणून प्रतिभा शिंदे यांनी दमानिया यांना सार्वजनिक चर्चेसाठी खुले निमंत्रण दिले आहे. सदर चर्चेसाठी महाराष्ट्रातील कोणतेही सभागृह दमानिया निवडू शकतात तसेच चर्चेसाठी तारीख व वेळ देखील दमानिया यांनी त्यांच्या सोयीने निश्चित करावी. तसेच सदर चर्चासत्रासाठी सर्व मीडिया प्रतिनिधींची उपस्थिती राहील आणि या कार्यक्रमाचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उचलेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
या खुल्या पत्रामुळे गोवंडी रुग्णालयाच्या PPP प्रकल्पावरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, दमानिया यांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




