

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून जळगाव शहरासह जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यामध्ये सट्टा, पत्ता,जुगार, सोरट, गुटखा व तत्सम अवैध धंदे सर्रास सुरू आहे. महिला व चिमुकल्या मुलींवर अत्याचार होत आहेत. जळगाव जिल्ह्यात खुलेआम खून आणि खुनाचे सत्र व मारामाऱ्या, गुन्हेगारी कारवाया यासह घरफोड्या, दरोडे, जबरी चोरी, चैन स्नचिंग अशा घटना सतत सुरू आहेत. असा आरोप राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड या संघटनेने केलेला असुन या सर्व घटना बंद व्हाव्यात. तसेच ६ नोव्हेंबर २०२४ रोजी ईच्छादेवी चौक येथे अवैधरित्या गॅस भरतांना ७ निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या वारसांना शासनाने दहा लाख रुपये मदत द्यावी. यासाठी राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडच्या वतीने ९ एप्रिल २०२५ व १५ एप्रिल २०२५ रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आलेले होते. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांवर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे आज रोजी द २२ एप्रिल २०२५ पासून जी.एस. ग्राउंड येथे राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड च्यावतीने लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.
सदर आंदोलन राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष रमेश कांबळे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेले आहे. आंदोलन स्थळी रमेश कांबळे यांच्यासह संस्थापक अध्यक्ष सुरेश अंभोरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आशाताई अंभोरे, जिल्हाध्यक्ष सागर अंभोरे, सतीश गायकवाड, संतोष शेंडगे, राजू खरात, शुद्धोधन गोडे, अलकाबाई गोडे, उज्वला सपकाळे, खंडू सपकाळे यांच्यासह राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडचे पदाधिकारी व ईतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




