जळगावप्रशासकीय

जळगाव महापालिकेत वसुंधरा संवर्धन सप्ताहाची प्रभावी सुरुवात

स्वच्छता मोहीम, पर्यावरण जागृती व्याख्यान व वृक्षलागवडीचे आवाहन

जळगाव (२४ एप्रिल): महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वसुंधरा संवर्धन कार्यक्रम दिनांक २२ एप्रिल ते १ मे या कालावधीत साजरा केला जात आहे. या उपक्रमाची प्रभावी सुरुवात जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली.

२२ एप्रिल रोजी महानगरपालिकेच्यावतीने मेहरूण तलावाच्या गणेश घाट परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ही मोहीम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आली. यावेळी महानगरपालिका पर्यावरण विभागाचे उपायुक्त पंकज गोसावी, पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील, अनिल करोसिया, तसेच आरोग्य विभागाचे कांबळे व पवार हे उपस्थित होते.

२३ एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहात पर्यावरण विषयक जागृतीपर व्याख्यान घेण्यात आले. पर्यावरण तज्ञ श्रीमती गीतांजली कौशिक यांनी जागतिक प्रदूषण समस्या आणि त्यावरील उपाय योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांनी अध्यक्षीय मनोगतातून नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून दिले. “वृक्षलागवड हीच उष्णतेवर उपाय योजना असून येत्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात झाडे लावावीत,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त पंकज गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त गणेश साठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले. यावेळी लेखा अधिकारी निर्मला गायकवाड, चंद्रकांत वानखेडे, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता “प्रदूषण विरहित जीवन” या विषयावर डॉक्टर श्रुती कीर्ती यांचे व्याख्यान मनपा सभागृहात होणार असून, महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button