

दसनूर, ता. रावेर : दसनूर येथील सुकी नदीकाठावरील प्राचीन उमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुमारे ८०० वर्षांपूर्वी उभारलेले हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, येथे स्वयंभू शिवलिंग आहे. हजारोंच्या संख्येने भक्तगण येथे दर्शनासाठी येतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा भक्तांचा विश्वास आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत महादेवांच्या मुकूटाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात झालेल्या या मिरवणुकीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यानंतर स्वयंभू पिंडीवर मुकूट चढवण्यात आला. रात्री मंदिरात जागराचे भजने आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश्वर महादेव संस्थानचे संचालक, भजनी मंडळ, तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या पवित्र प्रसंगी निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. हरिदास बोचरे यांनीही महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
अशी आहे पिंडीच्या उत्पत्तीची अख्यायिका
सुमारे ८०० वर्षांपूर्वी एका भक्ताला या ठिकाणी साक्षात्कार झाला. तो जागा स्वच्छ करत असताना त्याच्या फावड्याचा स्पर्श पिंडीला झाला आणि त्यातून पाणी व रक्ताच्या धारा बाहेर आल्या. गावकऱ्यांनी ही पिंड खोदून गावात स्थापण्याचा प्रयत्न केला, परंतु खोदताना जमिनीतून पाणी बाहेर येऊ लागले आणि पिंडीचा अंत सापडला नाही. ही पिंड स्वयंसिद्ध असल्याने येथेच स्थिर राहिली. पूर्वी हे मंदिर माती व दगडांचे होते, मात्र आता त्याला नव्या स्वरूपात बांधण्यात आले आहे.
‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या मंदिराचा धार्मिक वारसा
उमेश्वर महादेव मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. भाविकांसाठी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून येथे भागवत सप्ताह, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम नियमितपणे होतात. कार्तिक महिन्यात पहाटे कार्तिक स्नान, काकडा आरती आणि दिंडी काढली जाते.
दर सोमवारी मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. हे मंदिर केवळ दसनूरच नव्हे, तर पंचक्रोशीतील भक्तांसाठीही श्रद्धेचे केंद्र बनले आहे.




