

अमरावती | १४ जून २०२५:
जनहितासाठी सुरू असलेल्या बच्चू भाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला आज सातवा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छावा मराठा युवा महासंघाचे पदाधिकारी तथा समाजसेवक किरण ठाकूर यांनी आज सकाळी ८ वाजता मोझरी (ता. धामणगाव रेल्वे) येथे भेट दिली.
यावेळी त्यांनी बच्चू भाऊ यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काळजी घेण्याचे आवाहन केले. ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही केवळ काही लोकांची नाही, तर संपूर्ण जनतेच्या हक्कांची लढाई आहे. आम्ही तुमच्या संघर्षात ठामपणे सोबत आहोत.”
बच्चू भाऊ यांच्या उपोषणात शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ६००० रुपये मानधन, तसेच इतर सामाजिक व आर्थिक मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांना ठाकूर यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, “सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा हा लढा आणखी तीव्र होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
मोझरी गावात मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले असून, बच्चू भाऊ यांच्या आंदोलनाला जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ही केवळ मागण्या नाहीत, तर वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या घटकांचा हा न्यायासाठीचा लढा आहे.”
सरकारने जनतेच्या भावनांचा विचार करून सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करत किरण ठाकूर यांनी आंदोलनाला अधिक बळ देण्याचे संकेत दिले आहेत.




