जळगावसामाजिक

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

जळगाव – हरी विठ्ठल नगर येथील मंगल मैत्री ग्रुपच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व मिरवणूक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हरी विठ्ठल नगर येथील बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.

या कार्यक्रमास मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते कैलास हटकर व भारत सोनवणे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी माता रमाई आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, त्यांचे संघर्षमय जीवन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील त्यांचे मोलाचे योगदान यावर प्रकाश टाकला. रमाई यांच्या विचारांची आजच्या पिढीला असलेली आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

उद्घाटक डॉ. अमृता सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिलांनी आत्मसन्मानाने जगावे, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य घडवावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, हा माता रमाई आंबेडकर यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. सद्यस्थितीत महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक न्याय व समतेसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंगल मैत्री ग्रुपच्या महिलांनी केल्याबद्दल त्यांनी सर्व महिलांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या झनके यांनी केले.

यानंतर डॉ अमृता सोनवणे यांच्या हस्ते मिरवणुकीस झेंडा दाखवून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पुष्पांनी सुशोभित केलेल्या घोडागाडीत विराजमान असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यासह उद्घाटकांच्या हस्ते केक कापून उपस्थित महिलांनी एकमेकींना केक भरवून आनंद व्यक्त केला.

मिरवणुकीदरम्यान उपस्थित महिला, पुरुष व आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे डिजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी प्रमुख अतिथींनीही उपस्थितांच्या विनंतीनुसार नृत्यात सहभाग नोंदवला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

ही मिरवणूक हरी विठ्ठल नगर बाजारपेठ येथून राजीव गांधी नगर, वाघ नगर स्टॉप मार्गे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून पुढे चित्रा चौक, टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा इंगळे, उषा इंगळे, प्रमिला इंगळे, उषा तायडे, विद्या झनके, उज्वला सपकाळे, शैला पारधे, शोभा पातुडे, छाया इंगळे, आकाश तायडे, आकाश झिने यांच्यासह मंगल मैत्री ग्रुपच्या व परिवर्तन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास माँ शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा अंभोरे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बिऱ्हाडे यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button