जळगावराजकारण

मतदार याद्या अद्यावत केल्यावरच निवडणुका घ्याव्यात— राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुका 2026 साठी मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असतानाच मतदार याद्यांतील मोठ्या गोंधळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवत आयुक्तांना निवेदन सादर केले. मतदार याद्या अद्यावत केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मनपा प्रशासनाच्या गेल्या काही महिन्यांतील प्रभाग रचना, आरक्षण सोडत व आता मतदार याद्या प्रसिद्धी या सर्व प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या त्रुटींवर पक्षाने नाराजी व्यक्त केली. दोन महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर नागरिक व इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या. मात्र, त्या हरकतींवर मनपाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत झालेल्या चुकांमुळे राज्य निवडणूक आयोगाने मनपाला फटकारले होते व काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलावे लागले, हेही निवेदनात नमूद करण्यात आले.

20 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आढळून आला असून 5 ते 6 हजार तक्रारी मनपाकडे दाखल झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागात 2000 ते 3000 नावे दुबार असून काही नावांची दोन, तीन प्रभागात नोंद असल्याचे दिसून आले आहे. 15 ते 20 वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले नागरिक तसेच मृत मतदारांची नावे अद्यापही याद्यांमध्ये असल्याचे निदर्शनास आले.

मनपा प्रशासन राजकीय दबावाखाली कार्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला. सत्ताधारी पक्षातील इच्छुकांना निवडणूक सोपी जावी यासाठीच प्रभाग रचना, आरक्षण सोडत तसेच मतदार याद्यांमध्ये सोयीस्कर गैरप्रकार करण्यात आल्याचा ठपका या पक्षाने ठेवला.

मतदार यादीतील दुबार नावे, मृत मतदारांची नावे तसेच इतर विधानसभा किंवा बाहेरील मतदारसंघातील नावे तात्काळ कमी करून याद्या शुद्ध कराव्यात, असा ठाम आग्रह निवेदनात व्यक्त करण्यात आला. तसेच हरकती नोंदवण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी वाढवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला.

निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज मलिक, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, महानगर युवक अध्यक्ष रिकु चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, गौरव वाणी, कलाबाई शिरसाठ, रहीम तडवी, आकाश हिवाळे, गणेश पाटील, गौरव डांगे, कैलास पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button