

अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ग्रामीण व शहरी भागात वीज पुरवठा वारंवार खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतात शॉर्ट सर्किटमुळे पिकांचे आणि कृषी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जलगाव येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
महावितरणच्या वीज पुरवठा वितरणातील भोंगळ कारभारामुळे जलगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीस महावितरण कंपनी आणि राज्य शासन जबाबदार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ऊर्जा विभागाने जुन्या वीज वाहिन्या बदलण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावे केवळ राजकारण होत आहे, पण त्यांच्या प्रश्नांवर कोणीही गांभीर्याने विचार करत नाही, अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केली आहे.




