

जळगाव, दि. २२ – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा संवेदनशील प्रशासनाचे उदाहरण घालून दिले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेमुळे एका जखमी कुत्र्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुसंवर्धन विभागाला तातडीने सूचित केले. त्यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला त्वरित पाचारण केले. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी कुत्र्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले.
मुक्या जीवांसाठी सामाजिक भान
माणसांनी मुक्या जीवांची काळजी घ्यावी, या तत्त्वावर भर देत जिल्हाधिकारी कार्यालयाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात तहानलेली पाखरे पाण्यासाठी तडफडू नयेत म्हणून कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या.
या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या कक्षासमोरील कुंडीत पाणी टाकून केली. या सामाजिक उपक्रमात उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी पुढाकार घेतला आहे.
संवेदनशील प्रशासनाचा आदर्श
जखमी कुत्र्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देणे असो वा उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, प्रशासनाने दाखवलेल्या संवेदनशीलतेचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. फक्त माणसांसाठीच नव्हे, तर मुक्या जीवांसाठीही प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे, याचा हा अनुकरणीय आदर्श ठरतो.



