

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजातील गरजू रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा उपलब्ध व्हावा तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण तसेच थॅलेसेमिया व सिकलसेलग्रस्त बालकांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष विवेक प्रताप महाजन यांनी पुढाकार घेतला तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष धीरज किरण जावळे, सचिव सारिका विवेक महाजन, सदस्य विकास पाटील, विजया पांडे, पुनम ताडे आदींनी परिश्रम घेतले. रक्त संकलनाची जबाबदारी रेड प्लस ब्लड सेंटर यांनी पार पाडली. यासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे संचालक डॉ. भरत गायकवाड यांच्यासह अमोल शेलार, बिऱ्हाडे सर यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व शिवराजमुद्रा असलेले टी-शर्ट स्नेह भेट देण्यात आले.

रक्तदान शिबिराला आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक दिपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, विशाल भोळे, अमर जैन, निलेश तायडे, मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चे संचालक आदेश ललवाणी, मिनल जैन, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, संदिप धंडोरे, भगवान सोनवणे यांच्यासह मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी 210 बॅग रक्त संकलन झाले याबद्दल आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानत भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.




