जळगावशैक्षणिक

राज भाई या शेतकरी पुत्राने केली ड्रोन निर्मितीची किमया

जळगाव – नूतन मराठा महाविद्यालयातील राज भोई या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने स्वबळावर शेत फवारणीसाठी ‘ड्रोन’ तयार करत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘नूतन गोल्डन सायन्स बॉईज’ या उपक्रमांतर्गत त्याने हा प्रयोग साकारून नाविन्यपूर्ण संशोधन सादर केले आहे.

राज भोई याने यूट्यूब व गुगलच्या मदतीने ड्रोनचे तंत्र समजून घेतले आणि शेतीसाठी उपयुक्त असे फवारणी यंत्र बसवलेला ड्रोन विकसित केला. शेतात फवारणी करण्यासाठी मजुरांची होणारी कमतरता आणि फवारणी करतांना मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याने हा उपक्रम राबविला. ड्रोनच्या साहाय्याने पीक संरक्षणासाठी फवारणी करता येईल आणि मजुरीच्या खर्चात कपात होईल, असा त्याचा उद्देश आहे. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीचा प्रत्यय राजच्या या संशोधनातून आलेला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करत राज भोई याचा सत्कार केला. तसेच भविष्यात या ड्रोनला जास्त आधुनिक व सुधारित करण्यासाठी आवश्यक असणारा सर्व आर्थिक खर्च महाविद्यालय उचलेल असे त्यांनी जाहीर केले. या संशोधनासाठी सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख यांनी राज भोई याला मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील, डॉ. के. बी. पाटील, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजचे अभिनंदन केले.

राजच्या या नवकल्पनेमुळे नूतन मराठा महाविद्यालयाच्या नावाला नवी ओळख मिळाली आहे. या संशोधनातून भविष्यात शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त करून अशा नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्याचा मानस महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button