जळगावक्राईम

रामानंद नगर पोलिसांचा तपास फळाला; २०१७ मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी वाराणसीत जेरबंद !

आरोपीकडून १० तोळे सोने हस्तगत

जळगाव : रामानंद नगर पोलिसांनी सन २०१७ मध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करत संशयित आरोपीला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेत १० तोळे सोने (किंमत सुमारे ११ लाख ९० हजार रुपये) जप्त करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०१७ रोजी फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर.एल. कॉलनी, गांधी नगर, जळगाव) यांच्या पिंप्राळा परिसरातील साई ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानातील कामगार सुशांत सुनिल कुंडु (वय ३९, रा. नस्कर पारा, संत्रागाच्छी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) याने दागिने बनविण्यास दिलेल्या एकूण ३० तोळे सोन्याचा अपहार करून आपल्या मूळ गावी पलायन केले होते.

या घटनेवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२/२०१७ भादंवि कलम ४०८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा पोलिसांनी वारंवार शोध घेतला, मात्र तो सापडत नसल्याने हा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आला होता. अखेर पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुशांत कुंडु वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस पथकाने तेथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले आणि १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली. पुढील तपासादरम्यान आरोपीकडून कलकत्ता (प. बंगाल) येथून १० तोळे वजनाचे सुमारे ११ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले.

कारवाईत सहभागी अधिकारी:

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या कारवाईत रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय भूषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, अनिल सोननी व अतुल चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली. या उत्कृष्ट तपासामुळे सात वर्षांपूर्वीचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात रामानंद नगर पोलिसांना यश मिळाले असून पोलिसांच्या दक्षतेचे शहरात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button