

परंडा – देवणी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांनी शेतजमिनीच्या वादातून एका शेतमजुराला बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा दात पडला. या घटनेप्रकरणी महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने कांबळे यांना दोषी ठरवत २५,००० रुपये नुकसानभरपाई म्हणून पिडीत शेतमजुराला देण्याचा आदेश दिला आहे.
ही घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. गंगाधर गुरमे कोतवाड ( रा. चवण हिप्परगा, ता. देवणी, जि. लातूर ) यांना पोलिसांनी लाठीने मारहाण केली होती. या घटनेची दखल घेत परंडा येथील मानवी हक्क कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शेख यांनी १२ एप्रिल २०२१ रोजी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश कांबळे व लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाला दोषी ठरवत मानवी हक्क आयोगाने पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत २५,०००/- (पंचवीस हजार) रूपयांचा दंड लावला असून दंडाची रक्कम सहा आठवड्याच्या आत पिडीत शेतमजूराला देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल १२ मार्च २०२५ रोजी आयोगाने दिला आहेत.
इकबाल शेख यांनी सांगितले की, “पीडित व्यक्तीशी माझी ओळख नव्हती, परंतु एका गरीब शेतमजुरावर अन्याय झाल्याची बातमी वाचून मी अस्वस्थ झालो. त्यामुळे स्वतःच्या खर्चाने आयोगाकडे तक्रार दाखल केली. पोलीस प्रशासनाने खोट्या अहवालांद्वारे केस कमजोर करण्याचा प्रयत्न केला, पण सातत्याने पाठपुरावा करून आम्ही न्याय मिळवला.”
या संघर्षात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाचे ॲड. शकील शेख यांचे सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, कांबळे यांनी सहा आठवड्यांच्या आत ही भरपाई रक्कम देण्याचे निर्देश आहेत.




