

विटनेर – डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालय, विटनेर येथे नारी शक्ती अभियान अंतर्गत तसेच गावातील आदर्श नागरिक श्री. नवल भाऊ परदेशी यांचे चिरंजीव सात्विक यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली मोरे यांनी भूषविले. यावेळी प्रशिक्षणार्थी डॉ. देवयानी चव्हाण उपस्थित होत्या. सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
आरोग्य मार्गदर्शन :
डॉ. सोनाली मोरे यांनी स्वस्थ नारी – सशक्त भारत या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना त्वचेचे विकार, मासिक पाळी विषयक समस्या, व्यसनाधीनता, हिंसा, वर्तणुकीतील बदल, आत्महत्येच्या प्रवृत्ती, संतुलित आहाराचे महत्त्व अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन आरोग्य हेल्पलाइन क्रमांक 1800 233 2688 विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला.
मुख्याध्यापक श्री. पी. एस. बाविस्कर यांनी “नारी शक्ती” या संकल्पनेवर भाष्य करताना स्त्रियांची विशिष्ट कामगिरी पलीकडे समाजातील व्यापक भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. किरण तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री. बी. यू. राजपूत यांनी मानले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.




