

जळगाव, २३ मार्च २०२५ – शहीद दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ एक अनोखा समाजपयोगी उपक्रम राबविला. मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि सत्संग सेवा कार्याचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या वंदनाने झाली. तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जळगाव शहरातील राष्ट्रसंत गाडगे महाराज बेघर निवारा केंद्र येथे आर.एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सेवा पुरविण्यात आली. यावेळी नागरिकांना वृक्षरोप वाटप करण्यात आले आणि रामद्वारा तर्फे विशेष सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानंतर इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रेडक्रॉस भवन येथे मुकुंद गोसावी यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदानाच्या गरजेवर प्रकाश टाकला. उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, गंभीर रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः लग्नसराई, महाविद्यालयीन परीक्षा आणि सुट्ट्यांच्या कालावधीत रक्तपुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याने, १८ वर्षांवरील आणि ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या प्रत्येकाने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमात संत गाडगे महाराज शिक्षण संस्थेचे प्रशांत गायकवाड, मनपा प्रतिनिधी गायत्री पाटील, आर.एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी, स्वप्निल पालवे, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, सौ. शीतल काटे, वैभव निकुंभ, कल्पेशपुरी, मुक्ती फाउंडेशनच्या मुक्ता गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले. या समाजपयोगी उपक्रमामुळे शहीद दिनाचा खरा अर्थ अधोरेखित झाला असून, मुकुंद गोसावी यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




