राज्यशैक्षणिक

शाळेतील भ्रष्टाचाराविरोधात संतप्त पालकांचे विद्यार्थ्यांसह दादा भुसेंच्या दारात आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

नाशिक (दि. १६ जून): मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिकच्या अभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय व आदर्श शिशुविहार, उत्तमनगर सिडको या तीनही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात संतप्त पालकांनी आज मोठा एल्गार केला. तब्बल 200 ते 300 पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह थेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी शाळा भरवत आपला निषेध नोंदवला.

पालकांचा आरोप आहे की, या शाळांमध्ये दीर्घकाळापासून आर्थिक व प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना, तसेच राज्याचे शिक्षणमंत्री यांना शेकडो निवेदने दिली गेली, मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, या शाळांमधून विद्यार्थ्यांना बेकायदेशीररित्या प्रवेश नाकारण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

आजच्या आंदोलनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनी पालकांना आश्वासन दिले की, “उद्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती नेमली जाईल व तुम्हाला त्वरित न्याय मिळेल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल.” त्यांच्या या आश्वासनानंतर पालकांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले.

पालक संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडे १४ प्रमुख मागण्या सविस्तरपणे लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने येत्या आठ दिवसात या मागण्या मान्य न केल्यास, पालक आणि विद्यार्थी पुन्हा शाळेबाहेर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, किरण गायकवाड, पुष्पेंद्र महाजन, संदीप गांगुर्डे, सचिन देवरे, संगीता पाटील, वैशाली सूर्यवंशी यांसह अनेक पालक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button