

जळगाव: सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षकांचा निरोप समारंभ दुपारी 2 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई. सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री पाटील यांनी करताना निरोप समारंभाच्या उद्देशाची माहिती दिली. यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दोन वर्षांच्या अनुभवांबद्दल मनोगत व्यक्त केले. अर्चना येवले, चंद्रलेखा पवार व रवींद्र भंडारवार यांनी या काळात त्यांनी मिळवलेली कौशल्ये आणि विकासाविषयी विचार मांडले.
प्रमुख पाहुणे डॉ. केतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संधी कशा मिळवायच्या आणि सकारात्मक विचारसरणी कशी ठेवायची याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी अर्जुन आणि द्रोणाचार्य यांची उदाहरणे देत वास्तव परिस्थिती समजावून सांगितली. तसेच परीक्षेच्या तयारीसंदर्भात महत्त्वाचे सल्ले दिले आणि भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्नांविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता वानखेडे यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसे तयार राहावे, तसेच शिक्षक म्हणून कोणती कौशल्ये विकसित करावी, यावर भर दिला. “केवळ गुण मिळविणे पुरेसे नाही, तर ज्ञानाचा योग्य उपयोग समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाची विद्यार्थीनी दीपाली पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियंका पाटील यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.




