

जळगाव : मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इको क्लबतर्फे ‘संकल्पाची गुढी’ हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कडुलिंबाच्या झाडाची पाने न तोडता त्यालाच गुढी उभारून इको क्लबच्या संकल्पाचे तोरण बांधण्यात आले.
गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात इको क्लबचे प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते झाडाच्या गुढीचे पूजन करून करण्यात आली. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी इको क्लबचे सात संकल्प समजावून सांगितले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक असावे यासाठी लोकसहभागातून शंभू सुपर शॉपचे संचालक हेमंत वंजारी यांच्या आर्थिक सहकार्याने इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. हा क्लब केवळ स्थापन करून थांबणार नसून, ई-वेस्ट व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम यासंबंधी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.
यावेळी शाळेमध्ये ‘गुढीपाडवा नवीन प्रवेश वाढवा’ ही योजना २९ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक नाईक यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले.




