

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मंगळवारी पालक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका शितल कोळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षिका सुवर्णा अंभोरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाळेतील विविध उपक्रम, स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती पालकांना दिली. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांसंबंधीच्या विविध समस्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन शाळेच्या वतीने देण्यात आले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांची शाळेतली उपस्थिती, शाळाबाहेरील मुलांची समस्या, मोबाईलच्या वापराबाबत विचारमंथन, इको क्लबची गरज आणि पुढील शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमातील बदल यावर सखोल चर्चा करण्यात आली.
पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांचा विकास शाळेतच होतो, असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत पाठविणे आणि त्यांना सतत प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या मेळाव्यास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



