

जळगाव : संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाचे सोपे व रंजक प्रयोग सादर करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानातील मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून आनंदाने आत्मसात केल्या.
‘रंग बदलणारे पाणी’ या प्रयोगातून प्राथमिक रंगांपासून नवीन रंगांची निर्मिती कशी होते, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. ‘बुडते की तरंगते’ या प्रयोगात विविध वस्तू पाण्यात टाकून त्यांच्या वजन व घनतेनुसार होणारे बदल पाहण्यात आले. ‘फुगणारा फुगा’ या प्रयोगातून गरम हवेचा फैलाव कसा होतो, हे समजावून सांगण्यात आले.
तसेच ‘चुंबकाचा जादू’ या प्रयोगात चुंबक लोखंडाला आकर्षित करतो, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. ‘अंकुरण प्रयोगा’तून बियांना पाणी व हवा मिळाल्यास रोप तयार होण्याची प्रक्रिया समजावून देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता, जिज्ञासा व निरीक्षण कौशल्य वाढीस लागल्याचे दिसून आले. मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा प्रयोगात्मक उपक्रमांमुळे शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी होते, असे मत व्यक्त केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रयोगांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




