

जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय मराठी दिन व दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन संयुक्तरित्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. प्रतिभा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष डॉ. अनिता वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिभा पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनीत Lifi तंत्रज्ञान, चांद्रयान, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सोलर सिस्टीम आदी विषयांवरील कार्यरत (वर्किंग) मॉडेल्स सादर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या मॉडेल्सद्वारे विज्ञानातील संकल्पना प्रभावीपणे मांडल्या.

सूत्रसंचालन प्रथम वर्षाच्या शिक्षक विद्यार्थिनी साक्षी पाटील यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना हा दिवस C. V. Raman यांनी शोधलेल्या Raman Effect स्मरणार्थ साजरा केला जातो, असे सांगितले. तसेच रामन इफेक्टचा उपयोग कॅन्सरसारख्या आजारांच्या निदानासाठीही केला जातो, अशी माहिती दिली.
प्रथम वर्षाच्या शिक्षक विद्यार्थीनी हर्षला जोशी यांनी आपल्या मनोगतात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनातील सर्वांगीण विकासासाठी विज्ञानाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिभा पाटील यांनी शिक्षण घेत असताना व कार्यरत असताना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. मातृभाषेच्या संवर्धनासोबतच वैज्ञानिक प्रगती साधण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिन व राष्ट्रीय मराठी दिनाच्या शुभेच्छा देत दैनंदिन जीवनात भाषा व विज्ञान यांचे संतुलित महत्त्व स्पष्ट केले. ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेत महिलांचा कॅटलिस्ट (गतीवर्धक) म्हणून महत्त्वाचा सहभाग राहील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, ग्रंथपाल श्री. पंकज वाघ, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला.




