

जळगाव – सद्गुरु शिक्षण सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे मॅडम होत्या. कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयश्री पाटील यांनी गणित म्हणजे केवळ आकडेमोड नसून ती विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत असल्याचे सांगितले. श्रीनिवास रामानुजन यांनी संख्या सिद्धांत, अनंत मालिका यांसारख्या क्लिष्ट विषयांमध्ये दिलेले अतुलनीय योगदान आजही जगाला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रतिभेला आणि संशोधनाला अभिवादन करण्यासाठीच राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका विद्या गुजर हिने आपले मनोगत व्यक्त करताना गणिताचा दैनंदिन जीवनातील वापर समर्पक उदाहरणांद्वारे उलगडून दाखवला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नकळतपणे गणिताचा कसा वापर होतो, हे तिने प्रभावीपणे मांडले.
समारोपाच्या भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करण्यावर भर दिला. गणिताशी मैत्री केल्यास ते विश्वाची रहस्ये उलगडण्याचे साधन ठरते, असे सांगत गणितामुळे तर्कशुद्ध विचारशक्ती विकसित होते आणि जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता निर्माण होते, असे मार्गदर्शन त्यांनी केले. वेळेचे नियोजन, खरेदी, खेळ यांसारख्या दैनंदिन बाबींमध्ये गणिताचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच श्रीनिवास रामानुजन हे त्यांच्या अफाट बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमांमुळे महान गणितज्ञ झाले, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, सुवर्णा अहिरे, श्री पंकज वाघ तसेच प्रथम वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा अहिरे यांनी केले.




