

जळगाव : वंजारी समाजात विवाह मुहूर्तावर लावून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबांचा सत्कार वंजारी युवा संघटनेतर्फे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात नव दांपत्याचे वडील विजय पंडित वाघ (वरपिता) व नंदू सुभाष घुगे पाटील (वधूपिता) यांचा जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश चाटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर वंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी वंजारी समाजात लग्न वेळेवर न लावल्यामुळे समाजाबद्दल चुकीचा संदेश जात असल्याचे नमूद केले. यावर उपाय म्हणून विवाह मुहूर्तावर लावण्याची जबाबदारी पालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या काही कुटुंबांमध्ये दोन वेळा लग्न लावण्याचा फॅड वाढत असून, तो टाळावा आणि एकदाच, मुहूर्तावर विवाह लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अवाढव्य अपेक्षा न बाळगता समजुतीने व तडजोडीने निर्णय घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. समाजातील विवाह संस्कृती सुदृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




