

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “हिंद दी चादर” उपक्रमांतर्गत गुरु तेग बहादुर साहेबांचा जीवनपट विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. त्यांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आला.
जीवनपट पाहताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्याग, धैर्य आणि धर्मनिष्ठेची प्रेरणा घेतली. मुघल सम्राट औरंगजेब यांच्या काळातील परिस्थिती व धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. तसेच दिल्लीतील चांदणी चौक येथे झालेल्या त्यांच्या शहादतीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या जीवनातून सत्य, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश घेण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे पालन करून समाजात एकात्मता व बंधुभाव जोपासण्याचे आवाहन केले.




