

भुसावळ : “प्रबोधनातून आंदोलन आणि आंदोलनातून सत्ता, यातूनच व्यवस्था परिवर्तन साध्य होणार आहे,” असे प्रतिपादन बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम यांनी केले.
भुसावळ येथील कमल गणपती हॉलमध्ये बामसेफ व मुलनिवासी संघाच्या राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून मेश्राम बोलत होते. ते म्हणाले की, फुले, शाहू आणि आंबेडकरी आंदोलनातून बुद्धिजीवी वर्ग तयार झाला असून बामसेफने गेल्या ४० वर्षांत या वर्गाला संघटित करून प्रबोधनाची क्रांती घडवली आहे. सध्या बामसेफ आंदोलनाच्या टप्प्यात असून, २०३० पर्यंत गावपातळीपासून बुथपातळीपर्यंत भक्कम संघटन उभे करून विशाल जनआंदोलन उभारले जाणार आहे.
शेतकरी सभेची साथ आवश्यक
उद्घाटक शेतकरी सभेचे राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले म्हणाले, “ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली प्रबोधनाची चळवळ थांबली होती. ती बामसेफने देशभर नेली आहे. सत्याला संघटनेची ताकद जोडल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. आज भाजपा सरकारने जनसुरक्षा विधेयकाद्वारे अघोषित आणीबाणी कायद्यात रुपांतरित केली आहे. या लढाईत शेतकरी सभेलाही सामावून घेण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले.
“इव्हीएम फोडण्याशिवाय पर्याय नाही”
अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी वामन मेश्राम म्हणाले, “मतदार यादीत नव्हे तर इव्हीएममध्येच घोटाळा होतो आहे. राहुल गांधींना इव्हीएम हटवायचे नाही, म्हणूनच मतचोरीची चर्चा केली जाते. आमचा मताधिकार मशीनमुळे संपुष्टात आला आहे आणि त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे इव्हीएम फोडणे; मात्र त्यासाठी १५ लाख बुथवर संघटना उभी करणे ही पूर्वशर्त आहे,” असे ते म्हणाले.
सदर अधिवेशनाला विशेष अतिथी म्हणून डॉ. मगन ससाणे, एड. राजेश झाल्टे, प्रा. दीपक वासनिक उपस्थित होते. तर वक्ते म्हणून प्रेमराज बोबडे, डॉ. प्रकाश कांबळे, सचिन बनसोडे, डॉ. राहुल भोईटे यांनी मार्गदर्शन केले. सदर अधिवेशनाचे प्रास्ताविक सुमित्र अहिरे यांनी केले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी बामसेफचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सर्व सहयोगी संघटना यांनी अथक परिश्रम घेतले.महाराष्ट्रातील सुमारे १० हजार प्रतिनिधी उपस्थित होते.




