

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीची छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासाठी दिलेली जागा आणि महापालिकेची शाळा क्रमांक 3 या दोन्ही ठिकाणांसाठी तब्बल 1.37 कोटी रुपयांची वसुली महापालिकेकडून होणार आहे. या मागील महत्त्वाचे श्रेय माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते.
सन 2016 मध्ये जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टला (अध्यक्ष प्रकाश बाबुलाल चौबे) रुग्णालय चालवण्यासाठी महानगरपालिकेची जागा देण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने घरपट्टीचं एकही देयक भरले नव्हते. हा प्रकार नाईक यांनी वेळोवेळी महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर महापालिकेने कारवाई करत 2016-17 ते 2025-26 या कालावधीसाठी 84.67 लाख रुपये घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे याच संस्थेकडे महानगरपालिकेची पांजरापोळ चौक येथील शाळा क्र. 3 चालवण्याची जबाबदारी होती. करारनाम्याप्रमाणे दरवर्षी 3.78 लाख रुपये इतके भाडे ठरवले असतांनाही गेल्या 9 वर्षांपासून एकही रुपया भरण्यात आलेला नाही. त्यामुळे एकूण 33.69 लाख रुपये भाडे व 19.20 लाख रुपये इतकी थकबाकी व दंड वसूल करण्यात येणार असून संस्थेकडून एकूण 1.37 कोटी रुपये इतकी वसुली होणार आहे.
माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अशा प्रकारे जळगाव शहरातील सुमारे २० ते २५ संस्थांनी अजूनही महानगरपालिकेच्या कराचे एकही देयक भरलेले नाही. लवकरच त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. या कार्यवाहीत सहकार्य केल्याबद्दल प्रशांत नाईक यांनी प्रशासक, उपायुक्त धनश्री शिंदे, घरपट्टी विभाग, प्रभाग अधिकारी आणि वसुली विभागातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.




