जळगावसामाजिक

महापुरुषांचा अपमान व महिलांविषयी अश्लील वक्तव्य प्रकरणी भूषण पाटीलवर ‘मोक्का’ची मागणी

रिपब्लिकन सेनेचा जिल्हाभर ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा

भुसावळ – फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान, महिलांविषयी अत्यंत अश्लील वक्तव्ये करत समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण भास्कर पाटील याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करून त्याला तातडीने जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

आरोपी भूषण भास्कर पाटील (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याने ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फेसबुक लाईव्हद्वारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत नीच व अर्वाच्य भाषा वापरून वक्तव्ये केली. याशिवाय महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची जाहीर धमकी देत कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0040/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपब्लिकन सेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आरोपीने महापुरुषांचा अपमान करण्याबरोबरच महिलांविषयी अत्यंत लज्जास्पद व अश्लील भाषेत टिप्पणी केली. तसेच राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पाचपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—

आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करून जिल्हाबंदी (तडीपारी) करावी, त्याचे फेसबुक अकाउंट कायमस्वरूपी ब्लॉक करण्यासाठी सायबर सेलने तातडीची पावले उचलावीत, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ तसेच महिलांचा विनयभंगप्रकरणी वाढीव कलमे लावावीत आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी.

“प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन दिवसांच्या आत आरोपीला जेरबंद करावे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही, तर रिपब्लिकन सेना व सर्व समाजबांधवांच्या वतीने जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी दिला.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, मेजर जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे, जिल्हा उपाध्यक्ष राजश्रीताई सोनवणे तसेच बंटी नरवाडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button