

जळगाव – वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘एक घास चिऊचा’ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडताना सांगितले की, ज्या प्रकारे आई आपल्या बाळाला मायेने एक घास भरवते, त्याचप्रमाणे आपणही चिमण्यांसाठी थोडे अन्न आणि पाणी उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांना पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यास सांगण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ साहित्य वापरून जलपात्र तयार केले आणि ते घराच्या छतावर, खिडकीला किंवा झाडाच्या फांदीला लावले.
उन्हाळ्यात चिमण्यांची तहान भागवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकणे दुर्मीळ झाले असून, तो केवळ कविता, बडबडगीते आणि पुस्तकांपुरता मर्यादित राहू नये, यासाठीच हा प्रयत्न करण्यात आला. चिमण्यांचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.




