जळगावशैक्षणिक

शारीरिक शिक्षकांच्या पद भरतीसाठी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघाचे निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी) — पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती प्रक्रियेत शारीरिक शिक्षकांच्या पदांची तातडीने भरती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात आज दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन देतांना जिल्ह्याचे प्रतिनिधी गणेश अरुण वंडोळे आणि पंकज वराडे उपस्थित होते. महासंघाने मांडलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढता लठ्ठपणा, शारीरिक हालचालीचा अभाव, मोबाईलचे व्यसन आणि शिस्तीचा अभाव या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक असणे अत्यावश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तसेच शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 आणि 21 ऑगस्ट 2025 नुसार प्रत्येकी 251 विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक नेमणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, मागील 15 ते 20 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, मनपा, नपा, समाजकल्याण व आदिवासी विभागातील शाळा व महाविद्यालयांमध्ये या पदांची भरती झालेली नाही.

यामुळे राज्यभरात बी.पी.एड. आणि एम.पी.एड. धारक बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. महासंघाने घेतलेल्या या राज्यव्यापी मोहिमेद्वारे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून शारीरिक शिक्षक भरतीसंदर्भात न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

1️⃣ शाळा व महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची तात्काळ भरती करावी.

2️⃣ जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच शासनपुरस्कृत सर्व शाळांमधील या पदांची भरती पवित्र पोर्टलमार्फतच करण्यात यावी.

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा राज्यातील बी.पी.एड. व एम.पी.एड. धारकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button