जळगावशैक्षणिक

‘देशरक्षकांसाठी राखी’; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

जळगाव – रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘देशरक्षकांसाठी राखी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रंगांच्या, आकर्षक आणि कलात्मक राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या.

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या जवानांप्रती विद्यार्थ्यांनी राखीच्या माध्यमातून आपुलकी व आदर व्यक्त केला.

राखी बनविताना विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे कागद, सजावटीचे साहित्य, मोती, रिबीन तसेच उपलब्ध वस्तूंचा कल्पकतेने वापर केला. स्वतःच्या हाताने राखी तयार करण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, कलात्मकता आणि कल्पकतेचा सुंदर आविष्कार घडविला. ‘ही राखी माझ्या देशरक्षक भावासाठी’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी मनापासून राख्या तयार केल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे सामाजिक व राष्ट्रीय महत्त्व सांगण्यात आले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या शौर्यामुळे आणि त्यागामुळे देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यामुळे राखी हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचे माध्यम ठरू शकतो, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत जवानांसाठी तयार केलेल्या राख्यांमधून देशप्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या अभिनव, संस्कारक्षम व देशप्रेम जागविणाऱ्या उपक्रमाचे पालक तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button