
नाशिक – नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती 2023 ची परीक्षा होऊन गुणांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर, जिल्हा परिषदेने विधानसभा आचारसंहिता लागायच्या एक दिवस आधी रात्री 10 वाजता फोन करून , दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टबर 2024 रोजी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून घेतली आणि त्याच दिवशी 50 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर आपल्याला नियुक्ती आदेश मिळेल या आशेवर संबंधित उमेदवार होते . पण आचारसंहिता संपल्यावर देखील आपल्या नियुक्तीचा विचार होत नाही हे लक्षात आल्यावर नवीन तात्पुरत्या यादीतील सबंधित उमेदवारांनी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्ती मिळणे बाबत निवेदन दिले होते. त्यानंतरही सुमारे 20 दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून आजपर्यंत फक्त चालढकल करण्याचे काम सुरू आहे. नियुक्त्या कधी मिळतील याबाबत अजूनही ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवार चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्यसेवक 40%,आरोग्यसेविका, शिक्षक भरती आदी सर्वांना नियुक्त्या मिळाल्या मग ग्रामसेवकांच्या नियुक्तीचे घोडे नेमके कुठे अडले हे समजणे कठीण झाले आहे.






