
जळगाव : वाघूर धरणातील पाणी जळगाव शहराच्या भविष्यातील पाणी गरजेसाठी राखीव ठेवावे, तसेच वाघूर धरणाचे पाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर प्रकल्पांकडे पाईपलाईनद्वारे वळविण्याच्या प्रस्तावाला विरोध करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या ९ तारखेला होणाऱ्या महासभेत वाघूर धरणातील पाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर ठिकाणी वळविण्याबाबत ठराव मांडण्यात येणार असल्याने त्याला विरोध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगितले की, जळगाव शहराचा झपाट्याने विस्तार होत असून सध्या नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भविष्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या आश्वासनाचा विचार करता वाघूर धरणातील उपलब्ध पाण्यावर प्रथम जळगाव शहराचा हक्क व गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा येईल अशा पद्धतीने पाणी इतरत्र वळविण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुल यांसारखे मोठे प्रकल्प उभारण्यापूर्वी त्यांच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र प्रकल्प उभारल्यानंतर पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा भविष्यात चुकीचा पायंडा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आली, तसेच बांधकामाच्या काळात क्युरिंगसह आवश्यक प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही शंका राहू नये, यासाठी सक्षम तांत्रिक यंत्रणेमार्फत तपासणी होणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
जळगावकरांच्या भविष्यातील पाणीप्रश्नाचा विचार करून सर्व नगरसेवकांनी महासभेत भूमिका घ्यावी. भविष्यात नागरिकांकडून ‘जळगावचे पाणी इतरत्र वळविले’ असा ठपका येऊ नये, यासाठी शहराच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवेदन देताना महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, राजू मोरे, महिला आघाडी महानगर अध्यक्षा मंगला पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, महानगर उपाध्यक्ष किरण राजपूत, गणेश पाटील, महानगर युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महानगर चिटणीस नईम खाटिक, माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल नामदेव वाघ, युवक महानगर उपाध्यक्ष गणेश हटकर, कार्यालय मंत्री सतीश चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.






