जळगावसामाजिक

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करा – पृथ्वीराज सोनवणे

जळगाव : जळगाव शहरात मागील दोन-तीन वर्षांपासून मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लहान बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना कुत्र्यांकडून चावण्याच्या घटना घडत आहेत. तसेच दुचाकीस्वार व इतर वाहनचालकांच्या मागे कुत्रे धावत असल्याने अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वाहनचालकांच्या मागे कुत्रे लागल्याने अपघात होण्याची शक्यता वाढत असून, काही नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या समस्येकडे केवळ प्राण्यांच्या व्यवस्थापनाचा विषय म्हणून न पाहता नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

सोनवणे यांनी मोकाट कुत्र्यांची नागरिकांच्या मागे धावण्याची क्षमता कमी करण्यासाठी काही ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित उपाययोजनांचाही विचार करण्याची सूचना केली आहे. मात्र अशा कोणत्याही उपायाचा वापर करण्यापूर्वी पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून त्याची सुरक्षितता तपासून, प्राण्यांना इजा होणार नाही अशा पद्धतीने आणि आवश्यक असल्यास प्रायोगिक तत्त्वावरच अंमलबजावणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

यासोबतच शहरात मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, धोकादायक कुत्र्यांचे व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेने या समस्येवर दीर्घकालीन व प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालावा, अशी मागणी माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button