जळगावशैक्षणिक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त “लेखन प्रेरणा दिन” व ग्रंथ दिंडीचे आयोजन

भुसावळ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात “लेखन प्रेरणा दिन” निमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, लेखनाची प्रेरणा निर्माण करणे तसेच साहित्य, ज्ञान आणि संस्कारांविषयी जागरूकता निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करून झाली. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृती आणि प्रेरणादायी पुस्तके हातात घेऊन महाविद्यालय परिसरातून उत्साहात दिंडी काढली. ज्ञानाचा प्रसार, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि साहित्याबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी ग्रंथ दिंडी ही केवळ पुस्तकांची मिरवणूक नसून ज्ञान, संस्कार, विचार आणि उज्ज्वल भविष्याची वाटचाल असल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान ३० मिनिटे वाचन करणे, दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचणे, ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे, मित्र-मैत्रिणींमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे आणि ज्ञानाचा प्रसार करून सुजाण व सुसंस्कृत समाज घडविण्यास हातभार लावण्याचा संकल्प करून घेतला.

“वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल आणि ज्ञान मिळवाल तर जग जिंकाल,” हा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रंथालय विभाग, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button