जळगावप्रशासकीयसामाजिक

अमली पदार्थमुक्त जळगावसाठी पोलीस दलाचा ‘मिशन RISE’ उपक्रम; ७ ऑगस्टपासून एम.जे. कॉलेजमधून होणार प्रारंभ

जळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या “अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र” या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव पोलीस दलाने “मिशन RISE” हा अभिनव जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून ‘युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते’ (Student Leaders) तयार करून त्यांच्या नेतृत्वातून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

RISE या संकल्पनेत R – Resist Drugs (अमली पदार्थांना ठाम नकार), I – Inspire Others (इतरांना प्रेरणा द्या), S – Support Friends (मित्रांना योग्य वेळी मदत करा) आणि E – Empower Drug-Free Communities (अमली पदार्थमुक्त समाज घडवा) असा संदेश देण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत जळगाव पोलीस दल विविध महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थी नेत्यांची निवड, मार्गदर्शन, जनजागृती कार्यशाळा, संवाद सत्रे, शपथविधी, रॅली, पोस्टर स्पर्धा तसेच सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृतीचे विविध उपक्रम राबविणार आहे. विद्यार्थी नेत्यांमार्फत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन व मदतीसाठी प्रेरित केले जाणार आहे.

या अभियानाची सुरुवात ७ ऑगस्टपासून एम.जे. महाविद्यालयातून करण्यात येणार असून, निवड झालेल्या सर्व यंग लीडर्सना विशेष ओळख बॅज प्रदान करण्यात येणार आहेत. भविष्यात प्रत्येक महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे युवा नेतृत्व निर्माण करण्याचा जळगाव पोलीस दलाचा संकल्प असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ‘मिशन RISE’ अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टर्सचे उद्घाटन आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) श्री. संजय येनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अमली पदार्थांविरुद्धची लढाई ही केवळ पोलीस दलाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून “Together for a Drug-Free Jalgaon” हे ध्येय प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन जळगाव पोलीस दलाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button