
जळगाव – राष्ट्रउभारणी, मानवसेवा, शिक्षण क्षेत्र तसेच सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना नवी दिल्लीतील द्वारका सेक्टर १३ येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दि. २३ ऑगस्ट रोजी ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशनकडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यता देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
प्रा. वाघ यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले आहे. साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले असून, त्यापैकी अनेकांनी डॉक्टर, अभियंता यांसह विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले आहे.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपले कार्य थांबविले नाही. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी करत कृषी व्यवसायातही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षणासोबतच सामाजिक आणि राष्ट्रकार्याची त्यांची वाटचाल सातत्याने सुरू राहिली.
राष्ट्रीय हिंदू संगठनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणी संघटनात्मक कार्य उभारण्यात त्यांनी योगदान दिले. संघटनेच्या सुरुवातीच्या काळात जळगाव जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष विजय कुमार शर्मा हे जिल्हाध्यक्ष असताना प्रा. वाघ यांनी मीडिया प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करत त्यांनी संघटन विस्ताराला चालना दिली. पुढे प्रयागराज येथे राष्ट्रीय परिषद सदस्य म्हणून हिंदु हृदय सम्राट श्रीमंत सत्येंद्रजी दुबे यांनी त्यांची निवड केली. या जबाबदारीनंतर त्यांच्या कार्याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
शिक्षण, सामाजिक कार्य, मानवसेवा आणि राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांतून त्यांनी अनेक विद्यार्थी व कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक व संस्कारक्षम परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांचे कार्य सुरू आहे.
आपल्याला मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून आपल्या कार्याची जडणघडण ज्या साने गुरुजी महाविद्यालयात झाली, त्या संस्थेतील शिक्षक-विद्यार्थी, सहकारी कार्यकर्ते तसेच राष्ट्रकार्याशी जोडलेल्या सर्व सहकाऱ्यांचा गौरव असल्याची भावना प्रा. वाघ यांनी व्यक्त केली. त्यांनी हा सन्मान साने गुरुजी महाविद्यालय तसेच राष्ट्रीय हिंदू संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमंत सत्येंद्रजी दुबे आणि देशभरातील सहकाऱ्यांना अर्पण केला.
मानवसेवा, राष्ट्रहिताची भावना आणि समाजपरिवर्तनाची जिद्द यांचा संगम असलेल्या प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.






