
जळगाव : जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे आयोजित २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा व शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या एकूण ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चिंधू लाड (अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव), रवींद्र पोळ (सेवानिवृत्त असिस्टंट), डॉ. विजय गरकल (बऱ्हाणपूर), डॉ. अश्विनी जायभाये, रमेश लाडवंजारी, श्रीराम मंदिर संस्था व समस्त वंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, सहायक आयुक्त गणेश चाटे, रवींद्र सोनवणे (मुख्याधिकारी, नशिराबाद नगर परिषद), नगरसेविका निकिता लाडवंजारी, तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर पाटील आणि देवानंद वंजारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजय गरकल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण परिश्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मोठे ध्येय ठेवून यश संपादन करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुरेश राजाराम वराडे यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत, समाजातून तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी घडावेत, यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा अंगीकारावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मोक्षदा राहुल लाडवंजारी व खुशबू भानुदास नाईक यांनी मनोगत व्यक्त करत संघटनेचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व प्रणाली नाईक यांनी केले. समारोपप्रसंगी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व समाजबांधवांचे आभार मानले. यंदा छापील निमंत्रणपत्रिकांऐवजी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून डिजिटल निमंत्रण देण्यात आले असून या अभिनव उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव (भाऊ) वंजारी, सचिव महादू सोनवणे, सहसचिव उमेश वाघ, तसेच भानुदास नाईक, चंदुलाल सानप, नंदू वंजारी, रामेश्वर पाटील, विजय लाडवंजारी, संतोष घुगे, उमेश आंधळे, सुधीर नाईक यांच्यासह वंजारी युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मनोहर काळे, जामनेर तालुकाध्यक्ष गजानन घ्यार, बोदवड तालुकाध्यक्ष अजय पाटील, मार्गदर्शक किरण वंजारी, सरचिटणीस राहुल भिसे, मार्गदर्शक प्रदीप काळे, के. डी. वंजारी, देवा वंजारी, संदीप काळे, अतुल पाडर व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाला.






