

जळगाव – संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात बालदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात विविध वेशभूषा परिधान केलेल्या लहानग्यांची रंगतदार उपस्थिती पाहून वातावरण आनंदमय झाले. बालदिनानिमित्त दर वर्षी आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा यंदा विशेष आकर्षण ठरली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सैनिक, स्वातंत्र्यसेनानी, पोलीस, डॉक्टर, राष्ट्रीय नेते, संत-साहित्य, विविध भारतीय संस्कृतीचे पोशाख, तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या व्यक्तिरेखा अशा विविध प्रकारची वेषभूषा सादर केली. लहान मुलांनी देशरक्षण व सेवाभावाचा संदेश देणारे पोशाख परिधान केल्याने प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले. काही विद्यार्थ्यांनी हाताने तयार केलेले चार्ट, संदेश फलक आणि प्रतीकांची मांडणी करून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश दिला.
मुलांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, निरागसता आणि सर्जनशीलता पाहून पालक, शिक्षक व उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. विद्यार्थ्यांनी गाव संस्कृती दर्शवणाऱ्या पारंपरिक वेषभूषादेखील परिधान केल्या होत्या, ज्यामुळे स्पर्धेला अधिक रंगत आली.
शाळेचे शिक्षक व फॅन्सी ड्रेस स्पर्धा समितीने मुलांचे सादरीकरण, वेशभूषेतील कल्पकता, संदेशप्रधानता आणि आत्मविश्वास या निकषांवर परीक्षण केले. शाळेच्या मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी बालदिनाचे महत्त्व सांगताना मुलांना कल्पकता, संस्कार, देशभक्ती आणि सामाजिक मूल्ये जोपासण्याचे प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचारीवर्गाने उत्तमरीत्या केले.




