
जळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘एक दिवस शिक्षक बनून बघू!’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका, जबाबदारी आणि अध्यापन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच पालकांचा शालेय शिक्षण प्रक्रियेतील सहभाग वाढावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रमात पालक आणि विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकाची भूमिका स्वीकारून विविध विषयांचे अध्यापन केले. फळ्यावर लेखन, विद्यार्थ्यांशी संवाद, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विषयाचे स्पष्टीकरण, शैक्षणिक कृती तसेच विद्यार्थ्यांच्या आकलनाची पडताळणी अशा विविध अध्यापन पद्धतींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
‘शिकताना शिकवणे आणि शिकवताना शिकणे’ या संकल्पनेवर आधारित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाची संधी मिळाली. शिक्षकाची भूमिका पार पाडताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, प्रभावी संवाद, नेतृत्व, सादरीकरण आणि जबाबदारी यांसारख्या कौशल्यांचा विद्यार्थ्यांना अनुभव आला. पालकांनीही आपल्या ज्ञान व अनुभवाचा उपयोग करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेच्या शैक्षणिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्यामागील नियोजन, मेहनत आणि जबाबदारी यांची जाणीव झाली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील शैक्षणिक सहभागाचे नातेही अधिक दृढ झाले.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाने उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






