
जळगाव : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमातून शाळेतील माझी विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच इतर विद्यार्थ्यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
दिंडीत सहभागी माझी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी “इंधन वाचवा – भविष्य घडवा”, “ऊर्जा बचत हीच खरी देशभक्ती”, “सायकल चालवा – इंधन वाचवा”, “पर्यावरण वाचवा – पृथ्वी वाचवा” अशा घोषणा देत परिसरात जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या हातात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणारे आकर्षक फलक होते. दिंडीत पारंपरिक वारकरी संस्कृतीचा वारसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
यावेळी विद्यार्थ्यांना पेट्रोल, डिझेल, एलपीजी, वीज तसेच इतर ऊर्जा स्रोतांचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे, सायकलचा वापर वाढविणे, अनावश्यक इंधनाचा वापर टाळणे आणि ऊर्जा बचतीची सवय लावणे ही काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
दिंडीतील पारंबीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माझी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला. या दिंडीमुळे परिसरात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली.
फोटो कॅप्शन :
आषाढी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे आयोजित पर्यावरणपूरक दिंडीत इंधन बचतीचा संदेश देताना माझी विद्यार्थी व विद्यार्थी. यावेळी दिंडीतील पारंबीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.






