
जळगाव : येथील सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन तसेच संस्थेचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, सहायक प्राध्यापक डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, श्री. पंकज वाघ, श्री. अरविंद पवार, श्री. चंद्रकांत सपकाळे तसेच द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘स्व-व्यवस्थापन’ उपक्रमांतर्गत छात्राध्यापकांनी संपूर्ण दिवसभर शिक्षकाची भूमिका बजावत वर्ग अध्यापन, विद्यार्थ्यांची शिस्त तसेच प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अध्यापनासोबतच शिक्षकाच्या विविध जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
संस्थेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यात संस्थेचे योगदान अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत भावी शिक्षक म्हणून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक दृढ व्हावे आणि परस्परांमध्ये सुसंवाद वाढावा, यासाठी विद्यार्थ्यांनी विविध खेळ व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील म्हणाल्या, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून समाजाचा मार्गदर्शक आणि राष्ट्रनिर्माता असतो. सद्गुरु एज्युकेशन सोसायटीने नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य दिले असून भावी शिक्षकांनीही ही मूल्ये जपली पाहिजेत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पाटील यांनी केले, तर स्नेहा वाढई यांनी आभार मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.






