जळगावप्रशासकीय

जिल्हा क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करावे; मनमानी शुल्क रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

जळगाव : जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकडून आकारण्यात येणारे शुल्क तात्काळ रद्द करून संकुल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव जिल्हा क्रीडा संकुल विविध खेळाडू तसेच सकाळ-सायंकाळ व्यायाम व पायी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असतानाही संकुल सुरू करण्यात आले नव्हते. विविध खेळाडू व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला क्रीडा संकुल सुरू करावे लागले, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

संकुलाच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत वार्षिक ९ हजार ते ५६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सकाळी किंवा सायंकाळी चालण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून तासाला ५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीवर सुमारे पाच ते सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच संकुलातील सर्व सुविधा शहरातील खेळाडू व नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, माजी नगरसेवक राजु मोरे, माजी नगरसेवक सुनील माळी, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव पाचवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button